"प्रमाणपत्रे,दाखले आता सहज मिळती ऑनलाईन
सेवा केंद्रे, एसएमएस सेवा सारे आता सहज अधीन"
ई पंचायत प्रकल्पांतर्गत विविध सुविधा अधिक सक्षमपणे नागरिकांपर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी राज्यातील सर्व ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि २७९०० ग्रामपंचायतींना डेस्कटॉप संगणक, प्रिंटर कम स्कॅनर मशीन आणि इंटनेट जोडणी अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशा सेवा प्रदान करणाऱ्या केंद्रांचे संग्राम अर्थात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र असे नामकरण करण्यात आले आहे.
संग्राम केंद्राची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
- महाराष्ट्र राज्यातील सर्व संग्राम केंद्रांना सीएससी अर्थात कॉमन सर्व्हीस सेंटरचा तसेच महाऑनलाईनला एससीए चा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही केंद्रे पंचायत तसेच अन्य सीएससी सेवा देऊ करतात.
- सीएससी प्रमाणे ही केंद्रे सुद्धा बीटूसी सेवा प्रदान करण्यास पात्र आहेत.
- संग्राम केंद्रांच्या व्यापक संपर्कामुळे राज्यात वित्तीय समायोजनासाठी केंद्र चालकांना बँकींग करस्पॉन्डन्टस् म्हणूनही नियुक्त केले जात आहे.
- सुमारे २००० संग्राम केंद्रे कायमस्वरूपी युआयडी- आधार नोंदणी आणि अद्यतन केंद्रे म्हणून स्थापन करण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी केंद्रे स्थापन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.